व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासाबरोबरच खेळास महत्त्व द्या: अमित कुलकर्णी सोलापूर विद्यापीठात खेळाडू व गुणवंतांचा झाला सन्मान

सोलापूर, दि.29- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अभ्यासाबरोबरच विविध क्रीडा प्रकारांनाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांनी केले.

मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात  आला. यानिमित्त पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून अमित कुलकर्णी हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत हे होते. यावेळी व्यासपीठावर एवरेस्टवीर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, प्र-कलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषद सदस्य सचिन गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संगमेश्वर महाविद्यालयास प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या अरुण राठोड याचाही सन्मान करण्यात आला. क्रीडा, परीक्षा व आस्थापना विभाग यांच्यामार्फत यावेळी खेळाडू, यशवंत विद्यार्थी आणि गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला.

अमित कुलकर्णी म्हणाले की, ज्ञानसंस्कृत शिवाजी विद्यापीठापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाली. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अल्पावधीतच चांगली कामगिरी केली आहे. आज येथील विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात प्राविण्यता व गुणवत्ता प्राप्त केल्याचे पहावयास मिळत आहे. खेळामध्ये यश, अपयश पचवण्याची ताकद व ऊर्जा प्राप्त होते. स्पर्धेत यश मिळवण्यासाठी व जीवन जगण्यासाठी खेळामुळे संघर्ष करण्याकरिता बळ मिळते. संघर्षाशिवाय उच्च ध्येय गाठता येत नाही, असे ही कुलकर्णी यांनी यावेळी नमूद केले. यावेळी ननवरे यांनी एवरेस्ट सर करताना आलेले अनुभव कथन केले. जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाशिवाय जीवनात कोणतेही शिखर गाठता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात संघर्ष करत उंच शिखराप्रमाणे ध्येय ठेवून मेहनतीने यश प्राप्त करावे असे आवाहनही ननवरे यांनी यावेळी केले.

प्रभारी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून आज क्रीडा, परीक्षा व विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा बहुआयामी व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे. त्याची अंमलबजावणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सुरू केली आहे. चांगले विद्यार्थी घडविणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. यापुढेही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले.

Share This Post:

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

Also Read: